लहान मुलं घरामध्ये असतील तर नेहमीच सावध असावं लागतं. छोट्या-मोठ्या गोष्टींकडे अत्यंत बारकाईन लक्ष द्याव लागतं. ते कधी कोणती गोष्ट पटकन तोंडात टाकतील किंवा मग खाली पडतील याचा काही नेम नाही. त्यामुळे पालकांसह घरची सर्व मंडळी देखील मुलं सोबत असली की विशेष काळजी घेतात. पण कधी कधी मुलांकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतं. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
वडिलांचा निष्काळजीपणा चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. पाण्याऐवजी लेकाने चुकून डिझेल प्यायलं. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक दीड वर्षांचा मुलगा पाणी समजून डिझेल प्यायला. यामध्ये मुलाने जीव गमावला आहे. उपचारासाठी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील वाहन दुरुस्त करत होते. जवळच डिझेलची बाटली होती. खेळता खेळता दीड वर्षांचा लेक तिथे आला. बाटलीत पाणी असल्याचं समजून त्याने ती तोंडाला लावली. डिझेल पोटात गेल्यानं मुलाची तब्येत बिघडली. मुलाला उलट्या झाल्या. तसेच श्वास घेण्यासही त्रास जाणवला. उपचारासाठी कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. तेथून मुलाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं.
मुलाला भुवनेश्वर एम्समध्ये नेण्यात आलं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलाच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. मुलाच्या वडिलांनी डिझेलची बाटली खालीच ठेवली होती. त्यांचं लक्ष नसताना मुलानं पाणी समजून बाटली तोंडाला लावली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पालकांनी सतर्क असायला हवं आणि असे प्रकार टाळायला हवेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"