यूपीच्या बलिया जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वडील आपल्या एक वर्षाच्या मुलीला पोटाला बांधून ई-रिक्षा चालवत आहेत. दोकटी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिरंजी छपरा गावात राहणारा कमलेश वर्मा हा सध्या आईची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावत आहे. कमलेश वर्मा आणि त्याच्या 1 वर्षाच्या मुलीची गोष्ट डोळे पाणावणारी आहे. कमलेशची पत्नी सरस्वतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.
कमलेशने घरात असलेल्या आपल्या वृद्ध आईच्या मदतीने मुलीचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही दिवसांनी आईला देखील डोळ्यांनी दिसणं बंद झालं. अशा बिकट परिस्थितीत मुलीचे संगोपन करणे कमलेशला कठीण जात होते. कमलेशच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी कुणाला तरी द्या, असे त्याच्या नातेवाईकांनी सुचवले होते. पण कमलेशला त्याच्या मुलीला स्वतः वाढवायचे आहे.
आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेत कमलेशने आपल्या 1 वर्षाच्या मुलीला पोटाला बांधून ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. कमलेशने दिलेल्या माहितीनुसार, तो सकाळी आपल्या मुलीला उठवतो आणि त्यानंतर नाश्ता करून तिला एकत्र घेऊन ई-रिक्षात बसतो.
मुलीला स्वतःच्या पोटाला बांधून तो जवळपास 50 किलोमीटरचा प्रवास करतो. ज्यामध्ये तो रात्री उशिरापर्यंत सर्व प्रवाशांना घेऊन घरी पोहोचतो. कमलेश म्हणतो की, तो मुलीला उत्तम पद्धतीने वाढवून तिला उच्च शिक्षण देईल. हे ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. कमलेशचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"