ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. १८ - भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन व त्यांचा पुत्र अभिनेता अभिषेक बच्चनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गाझियाबाद न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बच्चन पिता-पुत्र अडचणीत सापडले आहेत.
'मित्र' या स्वयंसेवी संस्थेशी निगडीत असलेल्या चेतन धीमान या व्यक्तीने अमिताभ व अभिषेक यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. त्या जल्लोषात सामील झालेले अमिताभ व अभिषेक यांनी राष्ट्रध्वज शरीराभोवती गुंडाळला होता, ज्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असे धीमान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती अभिनेते असलेल्या बच्चन पिता-पुत्राने या वर्तनामुळे देशाची प्रतिमा मलीन केली आहे, असेही धिमान यांनी नमूद केले आहे. १३ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.