सुकमा - 'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदो मंगळवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. स्कुटीवरुन ट्रीपल सीट प्रवास करत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अगोदर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जगदलपूर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एसपी सुनिल शर्मा आणि कलेक्टर विनीत नंदनवार यांनी रुग्णालयात धाव घेत चांगल्या उपचाराचे निर्देश दिले आहेत.
सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर, स्थानिकांनी त्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, बचपन का प्यार या गाण्यामुळे सहदेव सोशल मीडिया सेन्सेशन बनला होता. तर, प्रसिद्ध गायक बादशहानेही सहदेवसोबत बचपन का प्यार हे गाणे गायले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली असून सर्वोत्तम उपचार देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.