इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचा दावा पाकिस्तानमधील अब्जाधीश उद्योगपती मियाँ मांशा यांनी केला आहे. आम्ही एकत्र येऊन काम केल्यास पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचा दौरा करू शकतात, असंही मांशा म्हणाले. कोणतंही शत्रुत्व कायमस्वरुपी नसतं. भारतासोबत असलेले संबंध ठीक करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
पाकिस्तानातील बहुराष्ट्रीय कंपनी 'निशात समूहा'चे प्रमुख असलेल्या मियाँ मांशा यांनी दोन्ही देशांमधील व्यापाराचा संदर्भ दिला. '१९६५ च्या युद्धाआधी पाकिस्तानचा ५० टक्के व्यापार भारतासोबत व्हायचा. आमच्याकडे अशा अनेक वस्तू ज्या भारताला दिल्या जाऊ शकतात. कोणतंही शत्रुत्व कायमस्वरुपी नसतं. पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. त्यामुळे आम्हाला भारतासोबतचे संबंध सुधारावे लागतील,' असं मांशा म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं. त्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर जोर देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मांशा यांनी केलेला दावा महत्त्वाचा मानला जात आहे. आम्ही पुढील १०० वर्षे भारतासोबत वैर ठेवणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला सांगितलं होतं. याबद्दल संवाद झाल्यास, तो सकारात्मक असल्यास २ देशांमधले व्यवसायिक संबंध सामान्य होतील, असंही त्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्यामागून संवाद सुरू असल्याची चर्चा याआधीही झाली होती. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा करण्यापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकारी त्रयस्थ देशात भेटल्याची चर्चा झाली होती.