ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 6 - मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार इनोसंट वरीद थेकेथला यांनी कास्टिंग काऊचवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचवर बोलताना खासदार इनोसंट बोलले आहेत की, "मल्याळम चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच अस्तित्वात नाही. मात्र खराब अभिनेत्री आपल्या इच्छेने बेडवर झोपू शकतात". इनोसंट यांनी सांगितलं आहे की, "आज वेळ बदलली आहे. जर एखाद्या महिलेसमोर इनडिसेंट प्रपोजल ठेवण्यात आला तर ती गोष्ट प्रसारमाध्यमांमध्ये येण्यासाठी एक सेकंदही लागत नाही".
आणखी वाचा -
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना इनोसंट यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते बोलले की, "मल्याळम चित्रपटसृष्टी एकदम स्वच्छ आहे, आणि कास्टिंग काऊचसारखा कोणताही प्रकार सध्या अस्तित्वात नाही. आता जुने दिवस राहिलेले नाहीत. सध्या परिस्थिती अशी आहे की, एखाद्या महिलेसोबत वाईट वर्तवणूक जरी केली तर लगेच प्रसारमाध्यमांना माहिती मिळते. मात्र जर ती महिला वाईट असेल तर ती बेड शेअर करु शकते". इनोसंट सीपीएम समर्थित अपक्ष खासदार आहेत.
गेल्या आठवड्यात मल्याळम चित्रपट कलाकार असोसिएशनकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला अभिनेते दिलीप, मोहनलाल, ममूटी, आमदार मुकेश आणि केरळचे माजी परिवहन मंत्री गणेश कुमार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत एका अभिनेत्रीच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर असोसिएशनची भूमिका काय आहे अशी विचारणा पत्रकारांकडून करण्यात आली.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांनी नुकतीच वूमन इन सिनेमा कलेक्टिव्ह नावाने एक असोसिएशन सुरु केली आहे. या असोसिएशनने इनोसंट यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. "चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु पाहणा-या कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे लैगिंक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. आमच्या काही सहका-यांनीही कास्टिंग काऊचवर उघडपणे भाष्य केलं आहे. चित्रपटसृष्टी सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणापासून मुक्त आहे हे स्विकारणं कठीण आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची वक्तव्यं करताना काळजी घ्यायला हवी", असं मत असोसिएशनने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. अभिनेत्री मंजू या असोसिएशनची प्रमुख आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर इनोसंट यांनी आपल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा केला आहे. माझा बोलण्याचा तसा काही उद्देश नव्हता, मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असं त्यांनी सांगितलं आहे.