नवी दिल्ली - देशातील विविध क्षेत्रांत प्रगती झाली असली तरी आजही अनेक ठिकाणी योग्य सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. जीवनावश्यक गोष्टींसाठी देखील कित्येक लोकांना संघर्ष करावा लागतो. महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी घटना घडली आहे. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर देखील हाल झाले. कारण मृतदेह घेऊन जाण्यासाठी देखील वाहन न मिळाल्याने चार महिलांवर तो मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 80 वर्षीय महिला जिवंत असताना रुग्णवाहिका मिळाली नाही आणि नंतर मृत्यू झाल्यावर देखील शववाहिनी उपलब्ध झालं नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 4 महिला आपल्या खांद्यावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन जात आहेत.
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील रायपूर महसुआ गावातील हा व्हिडिओ आहे. यात शववाहिनी उपलब्ध नसल्याने 4 महिलांनी महिलेचा मृतदेह खांद्यावर उचलून नेला मृतदेह खांद्यावर घेऊन या महिलांना तब्बल 5 किलोमीटर चालावं लागलं आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने कुटुंबीयांनी महिलेला खाटेसह उचलून सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.
कुटुंबीयांचा त्रास कमी झाला नाही, कारण रुग्णवाहिकेनंतर कुटुंबीयांना शववाहिनी मिळाली नाही. अखेर घरातील 4 महिला आणि एका मुलीने मिळून खांद्यावरच वृद्ध महिलेचा मृतदेह उचलून दोन तासात 5 किमी प्रवास केला आणि अखेर आपल्या घरी पोहोचले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रेडक्रॉस जिल्हा मुख्यालयात शववाहिनी दिली जाते. इतर ठिकाणी शववाहिकेची सोय नाही. रुग्णांना केवळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मृत्यूनंतर मृतदेह आपणच व्यवस्था करूनच घेऊन जावा लागत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.