Poor Road Engineering: दरवर्षी भारतात लाखो अपघात होतात, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यातील प्रत्येत अपघाताचे कारण वेगवेगळे असू शकते. यातील एक कारण खराब रस्तादेखील आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः खराब रस्त्यांमुळे अपघात होतात, असे म्हटले आहे.
गुजरातच्या गांधीनगरमध्ये आजोयित इंडियन रोड काँग्रेसच्या 82व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्याचे एक कारण सदोष रोड इंजीनिअरींग आहे. 5 लाख अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर 3 लाख लोक जखमी होतात. यामुळे देशाच्या देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) तीन टक्के तोटा होतो. मीदेखील अपघाताचा बळी ठरलो आहे, माझीही चार हाडे मोडली आहेत.
ते पुढे म्हणाले, बळीच्या बकऱ्याप्रमाणे प्रत्येक अपघातासाठी चालकाला जबाबदार धरले जाते. पण, मी सांगू इच्छितो की, बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे आणि चुकीच्या रोड इंजीनिअरींगमुळे होतात. रस्ते तयार करताना, अपघात टाळण्यासाठी ते योग्य प्रकारे इंजिनीअर केलेले आहेत, याची काळजी घेतली पाहिजे. अपघातातील मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू 18 ते 34 वयोगटातील आहेत. त्यापैकी बरेच जण अभियंते आणि डॉक्टर असू शकतात. तरुण पिढीचा अशाप्रकारे मृत्यू होणे देशासाठी चांगले नाही.
रोड इंजीनिअरींग म्हणजे काय?रोड इंजीनिअरींगमध्ये रस्त्यांची रचना, गुणवत्ता आणि देखभाल, यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. चांगले रस्ते अभियांत्रिकी सुनिश्चित करते की रस्ते सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ आहेत. चांगले रस्ते अपघात कमी करण्यास आणि सुरक्षा सुधारण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, चांगले रस्ते प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करण्यासही मदत करतात. यामुळे रस्ते अधिक टिकाऊ बनतात, ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो.