पीएम मोदीबद्दल अक्षेपार्ह शब्द; मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:58 PM2023-05-03T20:58:34+5:302023-05-03T20:59:57+5:30
ECI Show Cause Notice: निवडणूक आयोगाने भाजप नेते बसनगौडा पाटील यांनाही नोटीस बजावली आहे.
ECI Notices To Priyank Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि आमदार प्रियांक खर्गे यांना बुधवारी (3 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रथमदर्शनी हे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांक खर्गे यांनी अलीकडेच त्यांच्या एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी 'नालायक' हा शब्द वापरला होता. प्रियांक हे कर्नाटकातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. यावेळीही ते याच जागेवरुन निवडणूक लढवत आहेत.
भाजप आमदारालाही ECI नोटीस
सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने भाजप आमदार बसनगौडा आर पाटील (यत्नाल) यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बसनागौडा हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील त्यांच्या एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी 'विषारी साप' शब्द वापरल्यानंतर, बसनगौडा यांनी सोनिया गांधींसाठी 'विष्कन्या' शब्द वापरला होता.
गुरुवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रियंक खर्गे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. प्रियांक खर्गे यांना गुरुवारी (4 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपने प्रियांका यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली होती. त्याचवेळी बसनागौडा यांनाही गुरुवारी (4 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. बसनगौडा यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.