लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नेत्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. अनेक नेते वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येऊ लागले आहेत. भाजपाच्या बदायूमधील उमेदवार संघमित्रा मौर्य यांनी एका भाषणात थेट गुंडगिरीची भाषा केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यासोबत कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, तर घाबरु नका. संघमित्रा मौर्य त्याच्यापेक्षा मोठी गुंड होईल, असं विधान त्यांनी केलं. संघमित्रा मौर्य भाजपाचे वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कन्या आहेत. स्वामी प्रसाद मौर्य योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. संघमित्रा मौर्य यांनी संभल जिल्ह्यातील गुन्नौर विधानसभा मतदारसंघात भाषण करताना वादग्रस्त विधान केलं. 'येत्या निवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरु नका. कोणीही तुमच्या मान, सन्मान, स्वाभिमानाला धक्का लावला, तर संघमित्रा मौर्य त्यांच्यापेक्षाही मोठी गुंड होईल,' असं मौर्य म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
जनसभेला संबोधित करताना मौर्य यांनी सपा-बसपा आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'जनतेला आता कोणत्याही गुंडांना घाबरण्याची गरज नाही. कारण मी गुंडांपेक्षा मोठी गुंड झाले आहे. जेव्हा मी मैनपुरीमधून मैदानात उतरले, तेव्हा मुलायम सिंह यादव यांना आझमगढमधून निवडणूक लढवावी लागली होती,' अशा शब्दांमध्ये त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला.