नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बदायूं बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडितांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे नव्याने शवविच्छेदन करण्याचे प्रयत्न आज (रविवारी) दुसऱ्या दिवशीही अयशस्वी ठरले़ गंगेच्या पाण्याची पातळी वाढल्याने या पीडितांची थडगी पाण्यात बुडाल्याने सीबीआयच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले़ यानंतर दोन्ही पीडितांचे पहिले शवविच्छेदन करणाऱ्या महिला डॉक्टरची चौकशी करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे़दरम्यान, पुरलेले मृतदेह बाहेर काढायचेच होते तर इतका वेळखाऊपणा का? असा सवाल पीडित कुटुंबाकडून होत आहे़ यावर आपली बाजू मांडताना सीबीआयने म्हटले की,मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय केवळ त्रिसदस्यीय वैद्यकीय समिती करू शकते़ सीबीआय केवळ यात सहकार्य करू शकते़ सीबीआय सूत्रांनी सांगितले की, समितीने गुरुवारी बैठक घेऊन मृतदेह काढण्याचा निर्णय घेतला होता़ निर्णय घेताच यासाठी त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतली़ काल मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेले; पण गंगेच्या पाण्यात दोन्ही पीडितांची थडगी पूर्णत: बुडाल्याने यात यश आले नाही़ आजही तीच स्थिती कायम होती़ येत्या दिवसांतही गंगेचे पाणी कमी होण्याची शक्यता नाही़ अशा स्थितीत थडग्यातून मृतदेह बाहेर काढणे आणखी कठीण झाले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
बदायूं : शवविच्छेदनाचे प्रयत्न पुन्हा अयशस्वी
By admin | Published: July 21, 2014 2:08 AM