लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाने कायदा हाती घेण्याऱ्या बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही जणांची हत्या झाली होती. गोभक्तीच्या नावाने केल्या जाणाऱ्या हत्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे गेल्या महिन्यात साबरमती आश्रमातून सांगणाऱ्या मोदींनी अतिउत्साही व स्वयंभू गोरक्षकांना हा दुसऱ्यांदा इशारा दिला आहे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस झालेल्या बैठकीत बोलताना, पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्त्तव्याची माहिती नंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी पत्रकारांना दिली.अनंत कुमार यांच्या म्हणण्यानुसार मोदी असे म्हणाले की, गोरक्षणाच्या नावाने कोणाही व्यक्तीला अथवा गटाला कायदा हातात घेऊ दिला जाऊ शकत नाही. असे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.गाय मारणाऱ्यास १४ वर्षे शिक्षा; पण माणूस मारणाऱ्यास फक्त दोन वर्षे -देशाच्या विविध राज्यांत गाय मारणाऱ्यास पाच, सात किंवा १४ वर्षे तुरुंगवास ठोठावण्याचे कायदे आहेत. मात्र, बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याकडून दुसऱ्या माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला मात्र कायद्यात फक्त दोन वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. दिल्लीच्या एका न्यायाधीशांनीच एका हिट अँड रन खटल्याचा निकाल देताना कायद्यातील अशा विसंगतीवर बोट ठेवले. विरोधकांवरही शरसंधान केले-काही पक्ष राजकीय लाभासाठी गोरक्षणाच्या विषयाला राजकीय रंग देत आहेत, असा आरोप करून पंतप्रधान म्हणाले की, याला राजकीय अथवा सांप्रदायिक रंग दिला जाऊ नये, कारण असे करण्यात देशाचे काहीच भले होणार नाही. त्याऐवजी एकत्र येऊन या अनिष्ट गोष्टीचे उच्चाटन करावे.सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही विरोधक हा मुद्दा आग्रहाने मांडतील, याची जाणीव ठेवून त्यांची धार बोथट करण्यासाठी पंतप्रधानांनी हे कडक भाष्य केले असावे, असे मानले जात आहे.देशात गोरक्षणाचा कायदा आहे, परंतु व्यक्तिगत दुस्वासापोटी केले जाणारे गुन्हे खपवून घेतले जाऊ शकत नाहीत. -नरेंद्र मोदीलालू यादवांना मोदींच्या आडून कानपिचक्या-राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वीप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी जोरदार दबाव येत आहे.मात्र, राजदने त्यास ठाम नकार दिला आहे. या पार्श्वभूमिवर, सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू कलेल्या लढ्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना मोदींनी लालूंना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.भ्रष्टाचाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये, कारण त्यामुळे समाजात राजकीय नेत्यांची प्रतिमा मलीन होते, असे ते म्हणाले.
बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारा; मोदींचा आदेश
By admin | Published: July 17, 2017 3:07 AM