नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने भारती एअरटेल, वोडाफोन व आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांना ३0५0 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. एअरटेल, वोडाफोन व आयडिया या कंपन्यांच्या नेटवर्कशी रिलायन्स जिओ ग्राहकांकडून केले जाणारे फोन जोडले जात नसून, जोडणीमध्ये अडथळे येत असल्यामुळे हा दंड वसूल करण्याची शिफारस केली आहे. भारती एअरटेल व वोडाफोन यांना प्रत्येकी २१ सर्कलसाठी प्रत्येकी ५0 कोटी रुपये याप्रमाणे प्रत्येकी १0५0 कोटी तर आयडियाच्या १९ सर्कलसाठी प्रत्येकी ५0 कोटीप्रमाणे ९५0 कोटी रु. असा दंड घेतला जाईल.रिलायन्स जिओला ५ सप्टेंबर रोजी सेवा सुरू करताच, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही दिवसांनी अन्य नेटवर्कशी कॉल जोडले जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे अन्य मोबाइल कंपन्या जिओ ग्राहकांना फोन जोडणी उपलब्ध करुन देत नसून, आपल्या ग्राहकांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार जिओ कंपनीने ‘ट्राय’कडे केली होती. त्याची शहानिशा करून, ‘ट्राय’ने या तीन कंपन्यांना दंड करण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. या तीन कंपन्या नियम व अटींचे पालन करत नसल्याचे दिसते. जिओ नेटवर्क ग्राहकांना अन्य नेटवर्कशी जोडू न देण्यामागे संबंधित कंपनीला स्पर्धेत उतरू न देण्याची भूमिका ग्राहकांच्या हिताच्या विरोधातील आहे, असे ट्रायने म्हटले आहे. मोबाइल ग्राहकांच्या असुविधेमध्ये आणखी भर पडू नये म्हणूनच केवळ या तीन कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस आपण करीत नाही आहोत, असे ट्रायने नमूद केले आहे. एअरटेल, वोडाफोन व आयडिया नेटवर्कने जिओ ग्राहकांना इंटरकनेक्शन सुविधा न पुरवल्याने ७५ टक्के कॉल अन्य नेटवर्कशी जोडले गेले नाही, असा दावा जिओने केला होता. प्रतिक्रिया नाहीएक हजार कॉलमधील कॉलपैकी पाचहून अधिक कॉल जोडण्यात अपयश येता कामा नये, असा नियम आहे. मात्र, रिलायन्स जिओ प्रकरणात एक हजारातील सुमारे ९६0 कॉल अन्य मोबाईल नेटवर्कशी जोडलेच जाऊ शकले नाहीत, असे जिओचे म्हणणे आहे. दंडाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास तिन्ही कंपन्यांनी तूर्त तरी टाळले आहे.
तीन मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा !
By admin | Published: October 23, 2016 1:14 AM