Bageshwar Bab Dhirendra Krishna Shastri News: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात या सोहळ्याची धूम पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, प्रभू श्रीराम आणि राम मंदिरावरून दावे, आरोप केले जात आहेत. अशातच बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यानी राम हा राजकारणाचा विषय नसल्याचे म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले की, राजकारण धर्माने चालते. धर्माचे राजकारण केले जात नाही. भारतातील नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. आता त्यांनी मत त्यांच्या बुद्धीला अनुसरुन दिले पाहिजे. भारत विश्वगुरु झाला पाहिजे हा दृष्टीकोन असणारे सरकारच निवडले पाहिजे. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे संपन्नता, अखंडता, एकता आहे. रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे, अशी टीका बागेश्वर बाबा यांनी केली.
ज्ञानवापीत शंकर आहेत यात दुमत असण्याचे कारण नाही
ज्ञानवापी मशिदीबाबत वाद सुरू आहे. यावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ज्ञानवापीत शंकर आहेत, यात दुमत नाही. तसेच मथुरा ही कृष्णाची आहे, यातही शंका नाही. देशात न्यायालय आहे. ASIला जे पुरावे मिळाले आहेत, त्यावरुन हे सिद्ध होते की तिथे सनातन धर्मच आहे. मोहम्मद घोरी, अकबर, बाबर यांनी आक्रमणे केली. मंदिरांवर जे हल्ले झाले, ज्या जखमा केल्या गेल्या ते घाव भरले जात आहेत. आताचा काळ हिंदू धर्मासाठी आणि हिंदूंसाठी सुवर्णकाळ आहे, असे बागेश्वर बाबा यांनी नमूद केले.
दरम्यान, राम आपला बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर बोलताना, रामाच्या नावावरुन राजकारण व्हायला नको, असे बागेश्वर बाबा म्हणाले.