भोपाळ : मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात पं. धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाममध्ये आपल्या पित्यासमवेत आलेली नीरज मौर्य (२८ वर्षे) ही मुलगी तिथून १२ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाली आहे. तसेच किडनी विकाराने त्रस्त असलेली नीलम सिंह (३३ वर्षे) ही महिला आपल्या पतीसह या धाममध्ये दर्शनासाठी आली होती. ती रांगेत उभी असतानाच अचानक जमिनीवर कोसळली व मरण पावली. या दोन घटनांमुळे बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत आले आहे.
फिरोजाबादमधील रहिवासी नीलम सिंह पती देवेंद्र सिंह याच्या सोबत बागेश्वर धाम येथे आली होती. नीलम भाविकांच्या रांगेत उभी असताना अचानक जमिनीवर कोसळली व मरण पावली. तिचे पती देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यापासून मी पत्नीसह दररोज बागेश्वर धाममध्ये परिक्रमा करत होतो. नीलमच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत होती. मात्र बुधवारी दुपारी पत्नीची प्रकृती बिघडली. मात्र असे चढउतार नेहमीच होत असल्याने मला त्यात फार गंभीर असे काही वाटले नाही. तिला बागेश्वर धाममधील अंगाराही दिला होता. (वृत्तसंस्था)