बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू तर एक तरुणी बेपत्ता, नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:29 PM2023-02-16T13:29:44+5:302023-02-16T14:09:53+5:30
Bageshwar Dham News : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत.
Bageshwar Dham News :मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये असलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही काळापासून खूप चर्चेत आहेत. त्यांच्या दरबारात अनेकजण आपल्या समस्या घेऊन जातात आणि बाबा त्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. दरम्यान, बागेश्वर धाम येथून एका महिलेच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. ही महिला उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील रहिवासी होती. महिलेला किडनीचा त्रास होता आणि गेल्या एक महिन्यापासून ती आपल्या पतीसोबत बागेश्वर धाम येथे राहत होती.
अर्जाचा नंबर येण्यापूर्वीच मृत्यू
रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे नीलम देवी नावाची महिला गेल्या एक महिन्यापासून बागेश्वर धाम येथे आली होती. सध्या बागेश्वर धाममध्ये धार्मिक महाकुंभाचे आयोजन केले आहे. या महाकुंभात धीरेंद्र शास्त्री यांनी ‘दैवी चमत्कारी’ दरबार उभारला असून, इथे मोठ्या संख्येने लोक आपल्या इच्छा आणि समस्यांचे अर्ज घेऊन येथे पोहोचतात. या दैवी 'चमत्कारी' दरबारात बुधवार(15 फेब्रुवारी) रोजी ही आजारी महिला पोहोचली होती. पण, तिच्या अर्जाचा क्रमांक येण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.
बाहेश्वर धाममधून तरुणी बेपत्ता
दुसरीकडे बागेश्वर धामच्या फँटम कोर्टातून एक मुलगी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. कुमारी नीरज मौर्य ही उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील देवकाली जयराम येथील ओमप्रकाश मौर्य यांची मुलगी आहे. गेल्या 12 फेब्रुवारी 2023 पासून ती बेपत्ता. वडिलांच्या म्हणण्यानुसार ती प्रीत दरबार बागेश्वर धाम येथून बेपत्ता झाली आहे. ओमप्रकाश मौर्य लोकांना आवाहन करत आहेत की, ज्या कोणाला मुलीबद्दल माहिती असेल त्यांनी त्वरित कळवावे.
काही दिवसांपासून धीरेंद्र शास्त्री चर्चेत
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम चालवतात. लोकांच्या समस्या 'चमत्काराने' सोडवल्याचा दावा ते आणि त्यांचे भक्त करतात. काही दिवसापूर्वीपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. मात्र अचानक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्यावर जादूटोणा आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाम मानव यांनी केला आहे. या आरोपांबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणतात की, ते चमत्कार करत नाहीत, तर देवाकडून मिळालेली ऑर्डर ते कागदावर लिहितात.