Bageshwar Dham Sarkar :बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. नागपुरात दरबार भरवल्यानंतर त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होत आहे. यानंतर अनेकजण पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. सोशल मीडियावरही बाबांच्या समर्थनार्थ नेटीझन्स पोस्ट करत आहेत. यानंतर आता त्यांचे गुरु रामभद्राचार्य (Rambhadracharya) हेदेखील त्यांच्या समर्थनार्थ आले आहेत. माझा शिष्य चारित्र्यहीन नाही, हा एक चमत्कार आहे, असे ते म्हणाले आहेत.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये न्यूज18 शी बोलताना ते म्हणाले की, 'माझा शिष्य परंपरेतून मिळालेला प्रसाद वाटप करतोय. श्याम मानव यांनी अंधश्रद्धेची चुकीची तक्रार केली आहे. अजमेर शरीफवर चादर चढवली जाते, तेव्हा अंधश्रद्धा नाही का? पाखंडी जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात, तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का? हे सत्य आहे, अंधश्रद्धा नाही. माझ्या शिष्याला मिळालेली धमकी चुकीची आहे. त्याच्यावर अन्याय होत आहे. त्याला धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,' अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणतात, 'माझा शिष्य चांगला आहे, कोणत्याही महिलेकडे पाहत नाही, तो चारित्र्यहीन नाही. परंपरेतून मिळालेला प्रसाद वाटप करतोय. त्या बिचाऱ्याने काय चूक केली? लोकांना चांगल्या माणसांची प्रगती पाहवत नाही, म्हणूनच हा वाद निर्माण केला जातोय. तो फक्त 26 वर्षांचा मुलगा आहे, लोक त्याची प्रगती बघू शकत नाहीत. माझ्या प्रेरणेने आज माझा शिष्य सर्व काही करतो आहे. तो काही वाईट करत असता, तर मी त्याला सांगितलं असतं,' असंही ते म्हणाले.
धीरेंद्र यांना जीवे मारण्याची धमकीपंडित धीरेंद्र शास्त्री यांना धमक्या आल्याची माहिती आहे. याप्रकरणी छतरपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. धमक्या मिळाल्याची तक्रार धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांनी केली आहे. बाघेश्वर धाम येथील पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा चुलत भाऊ लोकेश गर्ग याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अमर सिंह नावाच्या व्यक्तीने एका अनोळखी नंबरवरून कॉल करुन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.