भोपाळ - आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत आणि वादात असणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा बॅकफूटवर आले आहेत. हैहयवंशी क्षत्रिय समाजा संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “गेल्या काही दिवसांत एक विषय लक्षात आला आहे. एका चर्चेदरम्यान, मी भगवान परशुरामजी आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुनजी यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात जे काही बोललो, ते पवित्र हिंदू धर्मग्रंथांतील वर्णनाच्या आधारे बोललो आहे. आपला उद्देश कोणत्याही समाजाच्या अथवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. ना कधी असेल. कारण आपण नेहमीच सनातन एक्याच्या बाजूने राहत आलो आहोत. तरीही, जर आपल्या कुठल्याही शब्दामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपण सर्व हिंदू एक आहोत. एकच राहू. आमची एकता हीच आमची शक्ती आहे." असे ट्विट बागेश्वर धामच्या टि्वटर हँडलवर करण्यात आले आहे.
परशुराम जयंतीच्या दिवशी करण्यात आले होते वक्तव्य -परशुराम जयंतीच्या निमित्ताने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपल्या भक्तांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भक्तांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिले. याच वेळी, त्यांनी भगवान परशुरामा यांच्या संदर्भात सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की, "हे क्षत्रिय अचानकपणे कुठून प्रकट व्हायचे? यासंदर्भात थोडी चर्चा करू. सहस्त्रबाहू ज्या घराण्यातील होता तो हैहय वंश होता. भगवान परशुरामांनी हैहय वंशाचा नाश करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेतली. हैहय वंशाचा राजा अत्यंत दुष्ट, ऋषींवर अत्याचार करणारा आणि स्त्रियांवर बलात्कार करणारा होता."
एवढ्यावरच बाबा बागेश्वर थांबले नाही, ते पुढे म्हणाले, दुष्टांना मार्गातून बाजूला करणे हे साधूंचे कामच आहे. यामुळे त्यांनी हैहय वंशाच्या राजांना मारायला सुरुवात केली. मात्र आपल्या शास्त्रांच्या मर्यादांचे पालन करत त्यांनी, ना कधी स्त्रियांवर आपला परशू उचलला, ना मुला-मुलींवर. त्यानी आताताई राजांचा वध केला. पण त्यांच्या मुलांना हात लावला नाही. पण जेव्हा ती मुले तरुण झाली आणि त्यांनीही अत्याचार सुरू केले, त्यांनीही आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी भगवान परशुराम यांच्यावर हल्ला केला, तेव्हा भगवान परशुरामांनी त्या त्यांचा वध केला, नंतर त्यांना मुले झाली, त्यांचाही वध केला.