खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:40 AM2024-10-18T11:40:27+5:302024-10-18T11:46:11+5:30
पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे १५०० हून अधिक खातेदारांची आयुष्यभराची कमाई गायब झाली आहे.
उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील सिमगढी पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे १५०० हून अधिक खातेदारांची आयुष्यभराची कमाई गायब झाली आहे. खातेदारांनी त्यांचं पासबुक ऑनलाईन तपासलं असता ही घटना उघडकीस आली. यावेळी खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं आढळून आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टमास्तर फरार झाल्यावर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. खातेदारांनी त्यांनी ठेवलेल्या पैशांची माहिती घेण्यासाठी कमेरीदेवी पोस्ट ऑफिस गाठलं. बागेश्वरमधील सिमगढी, मझेरा आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक पासबुक घेऊन आले होते.
पोस्ट ऑफिसमध्ये लोकांनी पासबुक तपासलं असता त्यात लाखो रुपयांची रक्कम जमा होती, मात्र ऑनलाईन चेक केलं असता खात्यांमध्ये एकदम थोडी रक्कम दिसत होती. याच दरम्यान ७० वर्षीय शारदा देवीही पासबुक घेऊन आल्या होत्या. शारदा देवी यांनी चार वर्षांत २ लाख रुपये जमा केले होते, मात्र आता त्यांच्या खात्यात फक्त २००० रुपये शिल्लक आहेत.
राकेश राठोड यांनी १२ लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवले होते. मात्र त्यांच्या खात्यात आता शून्य रक्कम दिसत आहे. या फसवणुकीची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली. पोस्ट ऑफिसबाहेर लोक मोठ्या संख्येने जमा झाले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आपली फसवणूक करून कष्टाने कमावलेली रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे. या प्रकरणाबाबत अधिकारी खुशवंत सिंह म्हणाले की, परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. या संपूर्ण प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल.
बागेश्वरच्या सिमगढी पोस्ट ऑफिसमध्ये झालेल्या या फसवणुकीमुळे लोक चिंतेत आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. पोस्टमास्तरचा शोध घेतला जात आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा व पैसे परत करावेत, अशी मागणी खातेदारांनी केली आहे.