उत्तराखंडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बागेश्वर येथील कपकोटमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. धक्कादाय़क बाब म्हणजे विषारी मुंग्या चावल्याने मुलाने जीव गमावला आहे. त्याच्या मोठ्या भावालादेखील मुंग्या चावल्या. मात्र त्याची प्रकृती आता ठीक आहे. पौसारी गावात गुरुवारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पौसारी गावात राहणाऱ्या भूपेश राम यांची दोन मुलं गुरुवारी दुपारी घरासमोरील अंगणात खेळत होती. पाच वर्षांचा प्रियांशु आणि तीन वर्षांचा सागर खेळत असताना दोघांनाही मुंग्या चावल्या. त्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तीन वर्षांचा सागरचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
प्रियांशुवर उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कुटुंबीय त्याला घरी घेऊन आले. जिल्हा रुग्णालयातील डॉ. राहुल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास प्रियांशु आणि सागरला घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते. सागरचा आधीच मृत्यू झाला होता. प्रियांशुवर उपचार करण्यात आले. लाल रंगांच्या मोठ्या मुंग्यांनी मुलांना चावा घेतल्याचं त्यांचे वडील भूपेश राम यांनी सांगितल्याचं मिश्रा म्हणाले.
मुलांना दुपारच्या सुमारास मुंग्या चावल्या. कुटुंबीय त्यांना रात्री रुग्णालयात घेऊन आले. कुटुंबियांनी मुलांना रुग्णालयात आणण्यास उशीर केल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. तीन वर्षांच्या सागरच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावावर शोककळा पसरली आहे. लाल रंगाच्या मुंग्या अतिशय विषारी मानल्या जातात. त्यांना रेड फायर मुंग्या किंवा बुलेट मुंग्यादेखील म्हटलं जातं. या मुंग्या चावल्यास तातडीनं उपचार करायला हवेत. अन्यथा जीव जाऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.