डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, लुधियाना ( Marathi News ): प्रवासात सामान गहाळ झाल्याबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकरणात ग्राहक आयोगाने रेल्वे आणि विमान कंपनीला जबाबदार आहे. रेल्वे आणि संबंधित विमान कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश आयाेगाने दिले आहेत.
विमान प्रकरण
एस. के. गर्ग यांनी मे २०१८ मध्ये एमिरेट्स एअरलाइन्सने सिएटल ते दिल्ली प्रवास केला. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांची चेक इन केलेली बॅग गायब होती. त्यांच्या तक्रारीवर एअरलाइन्सने असा युक्तिवाद केला की, नियमानुसार चेक इन बॅगमध्ये मौल्यवान वस्तू आणि चलने प्रतिबंधित आहेत.
आयोगाचे निरीक्षण
प्रवाशांचे सामान सुरक्षित आणून देणे एअरलाइन्सचे कर्तव्य आहे. व्यवसायासाठी विमा कंपन्या सक्रियपणे अधिकारी आणि एजंट तैनात करतात. परंतु, विमा रक्कम देताना पॉलिसीधारकांना मदत करीत नाहीत.
काय दिला आदेश?
- विमा कंपनीने तक्रारदाराला १.६४ लाख ३० दिवसांत द्यावेत. - एमिरेट्स एअरलाइन्सने २५ हजार नुकसानभरपाई द्यावी.
रेल्वे प्रकरण
रोहतक- मुंबई ट्रेनमध्ये एसी डब्यातून २०१७ मध्ये बॅग चोरीच्या प्रकरणात मोनिका रॉय यांनी रेल्वे विरुद्ध ग्राहक आयोग रोहतकमध्ये दावा दाखल केला होता. यात रेल्वे कायदा, १९८९ प्रमाणे सामान बुक केले तरच रेल्वे नुकसानीसाठी जबाबदार ठरते हा मुद्दा रेल्वेने बचावात मांडला.
आयोगाने म्हटले...
अनारक्षित आणि आरक्षित तिकिटांच्या किमतीत लक्षणीय तफावत आहे. आरक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना किमान सुरक्षिततेची अपेक्षा असते. आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश, ही सेवेतील त्रुटी आहे.
किती भरपाई?
रेल्वेने २.४० लाख रुपये सामानाचे मूल्य म्हणून व सेवेतील त्रुटीपोटी पाच हजार आणि खटला खर्च पाच हजार प्रवाशाला द्यावेत.