नवी दिल्ली : तामिळनाडूच्या चेन्नईलगत तिरुवल्लूर जिल्ह्यात म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री एका मालगाडीला धडकली. हा अपघात म्हणजे ओडिशातील बालासोर रेल्वेअपघाताची पुरावृत्ती असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. अपघातानंतरचा डेटा-लॉगर व्हिडीओ समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.
बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जवळपास ३०० प्रवासी ठार, तर एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. मात्र, ही रेल्वे मुख्य मार्गाऐवजी मालगाडी उभी असलेल्या लूप लाइनवर गेली. डेटा-लॉगर व्हिडीओच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. रेल्वेच्या हालचाली व सिग्नलचे संकेत टिपण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात ठेवलेल्या उपकरणाला डेटा-लॉगर संबोधले जाते.
सरकारला कधी जाग येणार : राहुलरेल्वे अपघातांबाबत सरकारला कधी जाग येणार, असा सवाल उपस्थित करत विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. रेल्वे अपघातात किती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यानंतर सरकारची डोळे उघडतील, असे ते म्हणाले.