बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलींच्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीने केलेल्या भीषण हल्ल्यात स्वत: गंभीर जखमी होऊनही पाच नक्षलींना कंठस्नान घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शेर मुहम्मद या बहाद्दर जवानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.रायपूर येथील इस्पितळात उपचार सुरू असलेल्या शेर मुहम्मदने एकट्याने पाच नक्षलींना यमसदनास पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांच्यामुळे इतरही अनेक जवानांचे प्राण वाचल्याने तो सुकमा हल्ल्यातील ‘शेर’ ठरला आहे.शेर मोहम्मद मूळचा उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील आसिफाबाद चांदपूर या छोट्याशा गावातील असून, गेली चार वर्षे तो छत्तीसगढमध्ये ‘सीआरपीएफ’च्या प्रत्येक नक्षलविरोधी कारवार्ईत भाग घेत आला आहे.हल्ल्यात शेर मुहम्मद जखमी झाल्याचे कळल्यापासून, त्याला लवकर बरे वाटावे यासाठी घरी त्याची विधवा आई फरिदीबीबी सतत प्रार्थना करीत आहे. शेर मुहम्मदसाठी दुवा मागणारी ती एकटीच नाही. संपूर्ण गावच जणू त्याच्यासाठी प्रार्थना करीत असून, तो बरा होऊन लवकर परत यावा याची आतुरतेने वाट पाहत आहेत.देशासाठी तळहातावर शीर घेऊन लढणे हे शेर मुहम्मदच्या रक्तात वंशपरंपरेने भिनलेले आहे. त्याचे वडील नूर मोहम्मद सैन्यात होते व देशासाठी ते शहीद झाले. त्याचे काका अब्दुल सलामही लष्करात होते. त्याचा भाऊ मुबारक अली ‘आरटीओ’ निरीक्षक आहे. (वृत्तसंस्था)
माझ्या पतीने देशासाठी प्राणांची कुर्बानी दिली. माझा मुलगा शेर मुहम्मद हाही सीआरपीएफमध्ये बहादुरी गाजवीत आहे. त्याने नक्षलींशी दोन हात केले व इतर सहकाऱ्यांचे प्राण वाचविले याचा मला अभिमान आहे. माझ्या नातवंडांनीही लष्करातच जावे, असे मला वाटते.-फरिदाबीबी, शेर मुहम्मदची आई.