लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. डिसेंबरमध्ये भाजपामधून बाहेर पडलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप करत फुले यांनी दोनच महिन्यांपूर्वी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बहराईचच्या खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबरमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीदेखील काँग्रेसचा हात धरला. लोकसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे राहिले असताना आजी-माजी खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले. राकेश सचान समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते फतेहपूरचे माजी खासदार आहेत.