ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि.22 - "बाहुबली - द कन्क्ल्यूजन" चित्रपटात दिसलेला अभिनेता पी सुब्बाराजू हैदराबादमधील एका ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकला आहे. पी सुब्बाराजू याने "बाहुबली - द कन्क्ल्यूजन" चित्रपटात रवी वर्माची भूमिका निभावली होती. ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एक्साइज अॅण्ड प्रोहिबिशन डिपार्टमेंटच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पी सुब्बाराजूची चौकशी केली आहे. अधिका-यांनी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सुरु केलेली चौकशी संध्याकाळपर्यंत सुरु होती.
उत्पादन शुल्क अंमलबजावणी विभागाचे डायरेक्टर अकुन सभरवाल यांनी सांगितलं की, "पी सुब्बाराजू चौकशीत आम्हाला पुर्णपणे सहकार्य करत असून चौकशी अद्याप सुरु आहे". त्यांनी सांगितलं की, तेलगू अभिनेता तरुण कुमार आणि मुमैथ खानची देखील चौकशी केली जाणार आहे. दोन्ही अभिनेते विशेष तपास पथकासमोर हजर होणार आहेत.
विशेष तपास पथकाने नारकोटिक्स ड्रग्ज अॅण्ड सायकॉट्रॉपिक सबस्टंसेस अॅक्ट अंतर्गत टॉलिवूडच्या 12 अभिनेत्यांना समन्स जारी करत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. अधिका-यांनी चित्रपट दिग्दर्शक पूरी जग्धाध आणि सिनेमॅटोग्राफर श्याम नायडू यांचीही चौकशी केली आहे. १९ जुलैला दिग्दर्शक जग्धाध एसआयटीसमोर हजर राहिले होते. जग्धाध यांची सुमारे १० तास चौकशी करण्यात आली होती. २० जुलैला प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्याम के नायडू यांचीही जवळपास ६ तास कसून चौकशी करण्यात आली होती.
पोलिसांनी जग्धाध यांच्या केस आणि नखांचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. याप्रकरणी विशेष तपास पथकाने 13 जणांना अटक केली आहे. आरोपींकडे मोठ्या प्रमाणात सीम कार्ड्स सापडले होते. या सीम कार्ड्समध्ये अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांचे नंबर सापडले होते. गेल्या आठवड्यात हैदराबादमध्ये एलएसडी आणि एमडीएमए सारखे ड्रग्ज सापडल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती.