बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एका 62 वर्षांच्या व्यक्तीने अवघ्या काही दिवसात लग्न केलं आहे. बिहारच्या या राजकीय लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण हे लग्न 7 जन्म एकत्र राहण्यासाठी नाही तर निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी झालं आहे. अशोक महतो असं या व्यक्तीचं नाव असून बिहारच्या नवादामध्ये बाहुबली अशी त्याची ओळख आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षे जेलमध्ये घालवून परत आलेल्या अशोक महतो याला आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती. पण त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे हे शक्य झालं नाही. त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांनी त्याला सल्ला दिला की, जर त्याने लग्न केलं तर त्याच्या पत्नीला निवडणूक लढवता येईल. लालू यादव यांच्या सांगण्यावरून अशोक महतो याने नवरी शोधून लग्न केलं आणि त्यानंतर आता पत्नीला तिकीट मिळालं आहे.
अशोक महतो याला बिहारच्या नवादाचा बाहुबली म्हटलं जातं. त्याच्या आयुष्यावर वेब सिरीजही बनवण्यात आली आहे. त्याच्यावर 2000 साली एका कुटुंबाची हत्या केल्याचाही आरोप आहे. 2001 मध्ये, नवादा जेल ब्रेक प्रकरणात 17 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली.
नियमांनुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तीला जेलमधून बाहेर आल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे महतो कोणत्याही परिस्थितीत खासदार होऊ शकणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशातच अशोक महतोने लालू यादव यांच्याकडे आरजेडीचे तिकीट मागितले. त्यानंतर लालू यादव यांनी लग्न करण्याची कल्पना दिली. मग पत्नीला तिकीट दिले जाईल आणि कोणतीही अडचण येणार नाही असं सांगितलं.
लालू यादव यांच्या सांगण्यावरून अशोक महतो याने 2 दिवसांत नवरी शोधली. 62 वर्षीय अशोकने 46 वर्षीय अनिता कुमारीसोबत लग्न केलं. लग्नानंतर नवं जोडपं आशीर्वाद घेण्यासाठी लालू यादव यांच्या घरी पोहोचलं. त्यानंतर आरजेडीने पत्नीला बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.