नवी दिल्ली : बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या, 'मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. आता मागास लोकांसाठी लढायचे आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रित करायचे आहे. उत्तर प्रदेशात महाआघाडीला जिंकून आणणे गरजेच आहे. राजकारणात अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतात. सध्या देशाचे हित आणि पार्टीची चळवळ पाहता, यंदाची निवडणूक लढणार नाही. जर निवडणुकीनंतर संधी मिळाली तर पाहता येईल.'
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. समाजवादी पार्टी 38 आणि बहुजन समाज पार्टी 37 जागा लढवणार आहेत. तर, या आघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यातील जागावाटपामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमधील अधिकाधिक जागा समाजवादी पार्टीला सोडण्यात आल्या आहेत, तर पूर्व उत्तर प्रदेशमधील बहुतांश जागा मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसपाला झुकते माप देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 17 जागा ह्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी 10 जागांवर बहुजन समाज पार्टी लढणार आहे, तर समाजवादी पार्टी 7 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर समाजवादी पक्षाला विजय मिळाला होता, अशा जागा समाजवादी पार्टीला सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.