नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'सराब' या टिप्पणीवर पलटवार करताना राष्ट्रीय लोक दलाचे (रालद) नेते जयंत चौधरी यांनी भाजपावर हल्लाबोल करताना वादग्रस्त विधान केले आहे.
जयंत चौधरी यांनी एका रॅलीत संबोधित करताना म्हणाले, "ते तुम्हाला शराबी समजतील. तुम्हाला भेसळ म्हणतील तर मी सुद्धा त्यांच्यासाठी एक नाव शोधले आहे. ते बुटाने (जूते) मारहाण करतात. मी तर शिव्या देऊ शकत नाही. हे मोठे जूतिए आहेत. त्यामुळे ही 'बहुत जूतिया पार्टी' आहे."
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये झालेल्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा, बसप आणि आरएलडी या उत्तर प्रदेशातल्या पक्षांची तुलना 'सराब' म्हणजे दारूशी केली होती. यावरुन नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मेरठमधील सभेत "समाजवादी पक्षाचा 'स', राष्ट्रीय लोक दलाचा 'र' आणि बहुजन समाजवादी पक्षाचा 'ब' या तीन पक्षांची आद्याक्षरे मिळून 'सराब' शब्द तयार होतो. ही दारू तुमचा नाश करेल. उत्तर प्रदेशच्या हितासाठी 'शराब' म्हणजेच दारू चांगली नाही," असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला होता.