ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - उत्तरप्रदेशमधील बदायू येथील दोघा बहिणींच्या हत्याकांडाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. या दोघी बहिणींची हत्या झाली नसून आत्महत्या केली होती असा दावा सीबीआयने केला आहे. तसेच त्यांच्यावर बलात्कारही झाला नव्हता अशी माहितीही तपासातून समोर आली आहे.
उत्तरप्रदेशमधील बदायू जिल्ह्यात २७ मे रोजी दोघा बहिणींचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळला होता. या दोघींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप मुलींच्या कुटुंबियांनी केला होता. या आधारे उत्तरप्रदेश पोलिसांनी पप्पू यादव, अवधेश यादव यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. मृत मुली या अवघ्या १४ आणि १५ वर्षाच्या असल्याने देशभरात या अमानूष हत्याकांडामुळे खळबळ माजली होती. समाजसेवी संघटनांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा तीव्र निषेध केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने या कथीत हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आला होता.
जूनमध्ये सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला व तब्बल पाच महिन्यांनी सीबीआयला या प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आले आहे. या दोघा बहिणींची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा यांनी दिली. या दोघींची हत्या करताना बघणारा एकही साक्षीदार सीबीआयला मिळू शकलेला नाही. या दोघींनी फरफटत नेताना बघितल्याचे ज्याने म्हटले होते त्याची साक्षही खोटीच होती असे समोर आले आहे. या दोघींवर लैंगिक अत्याचार झालाच नव्हता असे हैद्राबादमधील वैद्यकीय प्रयोगशाळेने केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती सीबीआय उद्या कोर्टासमोर सादर करेल अशी शक्यता आहे. या दोघींची गावातील एका तरुणाशी मैत्री होती व याला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता.