ओडिशातील एका आदिवासी महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेमाने धन्यवाद म्हणत १०० रुपये पाठवले. मोदींनी देखील महिलेने पाठवलेल्या या प्रेमाचे आभार मानले आहेत. "नारी शक्तीच्या आशीर्वादाने 'विकसित भारत'साठी मला नेहमीच काम करण्याची प्रेरणा दिली आहे" असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेने भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांना १०० रुपये दिले आणि मोदींनी केलेल्या कार्याबद्दल मोदींचे आभार मानले. बैजयंत जय पांडा यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतत पोस्ट केली असून काही फोटो देखील शेअर केले आहेत.
"शुक्रवारी (18 ऑक्टोबर) पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेदरम्यान एका आदिवासी महिलेने मला १०० रुपये दिले आणि विनंती केली की पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करा. पैसे घेण्यासाठी मी वारंवार नकार देऊनही त्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. शेवटी हे पैसे मला घ्यावेच लागले" असं बैजयंत जय पांडा यांनी म्हटलं आहे.
हे ओडिशा आणि भारतात होत असलेल्या परिवर्तनाचं प्रतीक आहे असंही असं बैजयंत जय पांडा यांनी म्हटलं आहे. यानंतर या पोस्टवर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. "या आपुलकीने मी खूप प्रभावित झालो आहे. यासाठी मी आमच्या नारी शक्तीला सलाम करतो, जी मला नेहमी आशीर्वाद देते. त्यांच्या आशीर्वादानेच मला विकसित भारतासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते" असं मोदींनी म्हटलं आहे.