ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २१ - कत्तलखाना बंद केल्याचा बदला घेण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. मंगळूरूहून ४० किमी दूर असलेल्या दक्षिण कन्नड भागातील मूदाबिदरी येथे राहणारा फूलविक्रेता प्रशांत पुजारीची (वय २९) ९ ऑक्टोबर रोजी काही जणांनी हत्या केली होती. चेहरे झाकून, बाईकवरून आलेल्या काही तरूणांनी पुजारीवर चाकूने हल्ला करत त्याला ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या रविवारी चार आणि मंगळवारी इतर चार आरोपींना अटक केली. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून जमावाने एका इसमाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
मात्र मृत्यूपूर्वी पुजारीने त्याच्या हल्लेखोरांपैकी काही जणांची नावे वडिलांना सांगितली होती. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद हनिफ (३६), मोहम्मद इलियास (२७), इब्राहिम लिकायत (२६) आणि अब्दुल रशिद (३९ ) या चौघांना रविवारी तर मोहम्मद शरीफ (४२), मुस्तफा कवूर (२८) मोहम्मद मुस्तफा (२५) आणि कबीर (२८) या चौघांना मंगळवारी अटक केली. हनिफ आणि इम्तियाझ हे दोघेही मूदराबिदरी येथील एका कत्तलखान्यात काम करत होते. पूजारीच्या हत्येच्या काही दिवस आधीच त्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह कत्तलखान जबरदस्ती बंद पाडला. यामुले संतापलेल्या हनिफने मूदराबिदरी बस स्टँडवर चिथावणीखोर भाषण करत कत्तलखाना बंद पाडणा-या सर्वांचा बदला घेण्यात येईल, अशी शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पूजारीची त्याच्या दुकानाबाहेर चाकून भोसकून हत्या करण्यात आली.