भिंड - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी देशातील मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लीम लोक हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपा, बजरंग दल अशा संघटना ISI कडून पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे की, जितकेही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना सापडतात ते लोक बजरंग दल, भाजपा आणि आरएसएसकडून पैसे घेतात. आयएसआयकडून हेरगिरी करण्यासाठी मुस्लीम कमी पण इतर लोक जास्त आहेत हे समजून घ्यावं असं त्यांनी सांगितले.
आम्हाला देशभक्ती शिकवू नकाभाजपावर खोटा देशभक्तीचा आरोप लावत दिग्विजय सिंह म्हणाले की, आमच्या विचारधारेची लढाई भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही ते आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहेत. 1947 च्या पूर्वी हे लोक कुठे होते? जेव्हा इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तेव्हा हे लोक कुठे होते? त्यामुळे आम्हाला देशभक्ती शिकवू नका असा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला लगावला आहे.
मागील वर्षी दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा घेत भाजपावर निशाणा साधला होता. हिंदू धर्मातील दहशतवादी संघाशी जोडले गेले आहेत. हिंदू दहशतवादी आरएसएसच्या विचारसरणीतून येतात. द्वेषाची विचारधारा संघाकडून पसरविली जाते. जितके हिंदू दहशतवादी पकडले गेले ते संघाचे कार्यकर्ते आहेत. नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींना मारले होते ते देखील आरएसएस विचारधारेचे होते असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता.
तसेच संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणं आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरं कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत. आरएसएसचे कार्यकर्ते जमावाला हिंसेसाठी भडकावतात असा दावाही दिग्विजय सिंह यांनी केला होता.