Pathaan Movie : बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. आगामी 'पठाण' सिनेमात तो अॅक्शन भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. पठाणचे जसे पहिले गाणे 'बेशरम रंग' रिलीज झाले तसा पठाणचा वाद चिघळला. दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरुन अनेक संघटना आक्रमक झाल्या. बजरंग दलाने गुजरातमधील एका थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. आता मात्र विश्व हिंदू परिषदेने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. पठाणला विरोध न करण्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. (Vishwa Hindu Parishad)
'पठाण' विरोधात अनेक शहरांमध्ये निदर्शने करणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुजरातमध्ये सिनेमाला विरोध करणार नाही असे स्पष्ट केले आहे. गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री अशोक रावल यांनी अधिकृत माहिती दिली.ते म्हणाले, 'हिंदी सिनेमा पठाणला बजरंग दलाने विरोध केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील आक्षेपार्ह गाणी आणि शब्द काढण्याचे आदेश दिले. ही चांगली गोष्ट आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन. '
ते पुढे म्हणाले,'यासोबतच मी सेन्सॉर बोर्ड, निर्माता आणि थिएटर मालकांना विनंती करतो की फिल्म उद्योगातील योगदानात जर धर्म, संस्कृती आणि देशभक्ती या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर बजरंग दल आणि हिंदू समाजाला कोणतीच आपत्ती नसेल.' याशिवाय रावल यांनी सिनेमा बघावा की नाही हे आता जनतेच्या हातात आहे असे स्पष्ट केले आहे. '
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीदिवसांपूर्वीच एक वक्तव्य केले होते. अनावश्यक वक्तव्ये करणे टाळा असे त्यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले. त्यांचे हे वक्तव्य पठाणच्या वादादरम्यानच आल्याने म्हणूनच बजरंग दलाने ही भूमिका घेतल्याची चर्चा आता होत आहे. तसेच गुजरात मध्ये थिएटर्स ला पोलिस सुरक्षा देण्याचे आश्वासन गुजरात सरकारने दिले होते. त्यामुळे आता पठाणच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र दिसत आहे. उद्या २५ जानेवारी रोजी पठाण रिलीज होत असून आता सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.