न्याय मिळत नसेल...! ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकं गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:31 PM2023-05-30T13:31:56+5:302023-05-30T13:34:56+5:30
Wrestlers Protest : कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलक पैलवानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता पैलवान उत्तराखंडमधील हरिद्वारला जाणार असून तिथे पदकं विसर्जित करणार आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पदके हेच आमचे जीवन असून ती गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला अर्थ उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसू.
पैलवानांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले, "आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती 'गंगा मां' आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते."
"We will throw our medals in river Ganga in Haridwar today at 6pm," say #Wrestlers who are protesting against WFI (Wrestling Federation of India) president Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations pic.twitter.com/Mj7mDsZYDn
— ANI (@ANI) May 30, 2023
रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलक करत असलेल्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत.
आखाड्याबाहेरील 'कुस्ती' सुरूच
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला एक महिना झाला असून अद्याप तोडगा निघाला नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. दिल्लीत रविवारी नवीन संसद भवनासमोर आंदोलक करू इच्छित करू पाहणाऱ्या पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याशिवाय विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.