नवी दिल्ली : देशातील नामांकित पैलवानांची २३ एप्रिलपासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील 'दंगल' सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे, तरी अद्याप यावर कोणताही तोडगा निघाल्याचे दिसत नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असला तरी आंदोलक पैलवान सिंह यांच्या अटकेवर ठाम आहेत. भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते.
सोमवारी बजरंग पुनियाने हे आव्हान स्वीकारताना म्हटले, "आम्ही कोणत्याही टेस्टसाठी तयार आहोत, पण ते सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवे. संपूर्ण देशाला याची प्रश्नोत्तरे ऐकायला मिळावीत म्हणून नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी." तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे घोटाळे मोजायचे असतील तर आम्ही नार्को टेस्टसाठी तयार आहोत. लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या प्रशिक्षकांची देखील नार्को टेस्ट करावी, असेही पुनियाने सांगितले. खरं तर ब्रिजभूषण यांनी रविवारी सांगितले होते की, मी माझी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे, पण माझ्यासोबत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनीही ही टेस्ट करायला हवी, अशी माझी अट आहे.
पैलवानांच्या समर्थनार्थ खाप पंचायतलैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दबाव आणण्यासाठी रविवारी खाप पंचायतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे खाप पंचायतीने २३ मे रोजी कुस्तीपटूंच्या कँडल मार्चमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. सर्वजण एका ठिकाणी जमतील. शेतकरी आंदोलनाप्रमाणे कुस्तीपटूंचे हे प्रदर्शन दीर्घकाळ चालणार आहे.
मंगळवारी आंदोलनाला १ महिना होणारऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या मंगळवारी या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.