नवी दिल्ली : रविवारी देशाच्या नवीन संसदेचं थाटामाटात उद्घाटन पार पडलं. एकिकडे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा जल्लोष साजरा केला जात होता. तर, दुसरीकडे दिल्ली पोलीस आणि देशातील नामांकित पैलवान यांच्यांत आखाड्याबाहेरील 'कुस्ती' सुरू होती. दिल्ली पोलीस आणि पैलवानांच्या दंगलीवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच एका माजी आयपीएस अधिकाऱ्यांनं एक ट्विट केलं, ज्यावर पैलवान बजरंग पुनिया संतापल्याचे पाहायला मिळाले. माजी आयपीएस अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देताना, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत, असं पुनियानं म्हटले आहे.
माजी आयपीएस अधिकारी एनसी अस्थाना यांनी पैलवानांवर झालेली कारवाई योग्य असल्याचे ट्विट केले. तसेच गरज भासल्यास गोळी देखील मारली जाईल, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. रविवारी दिल्ली पोलिसांनी नवीन संसंद भवनासमोर आंदोलन करू इच्छित पाहणाऱ्या पैलवानांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून पैलवानांना आंदोलक करण्यापासून रोखले. महिनाभराहून अधिक काळ जंतरमंतर येथे कुस्तीगीर आंदोलन करत आहेत. पोलीस पैलवानांना ताब्यात घेत असताना बजरंग पुनियाने म्हटले, "आमच्यावर गोळ्या झाड्या."
माजी IPS अधिकाऱ्यानं काय लिहलं?बजरंग पुनियाच्या या विधानावर माजी IPS अधिकारी एनसी अस्थाना यांनी म्हटले, "गरज पडल्यास गोळ्याही झाडू. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही. सध्या कचऱ्याच्या ठेक्याप्रमाणे उचलून फेकले आहे. कलम १२९ मध्ये पोलिसांना गोळी मारण्याचा अधिकार आहे. योग्य वेळ आल्यावर ती इच्छा देखील पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक आहे. मग पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू."
अस्थाना यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना बजरंग पुनियाने लिहले, "हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबद्दल बोलत आहेत. भाऊ समोर उभे आहोत, मला सांगा गोळी खाण्यासाठी कुठे येऊ. मी शपथ घेतो, छातीवर गोळ्या झेलू पाठ दाखवणार नाही."