कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंगबली हे भाजपसाठी संजिवनी ठरत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेचा उल्लेख केल्यानंतर, भाजपने ‘बजरंगबली’ यांच्या नावाने व्होट बँक साधण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या जाहीर सभांमधून बजरंगबलींचा उल्लेख करायला विसरत नाहीत. बेंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक हनुमानजींची वेशभूषा करून पोहोचले होते. एवढेच नाही, तर या रॅलीमध्ये हनुमानजींचे पोस्टरही लावण्यात आले होते.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होत आहे. आता निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. या अखेरच्या टप्प्यात हा प्रचार 'बजरंगबलीं'भोवतीच फिरताना दिसत आहे. काँग्रेसने बजरंग दल या हिंदूवादी संघटनेवर बंदी घालण्यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र, लोकांचे लक्ष बजरंगबलींकडे वळविण्यात भाजप यशस्वी झाल्याचे दिसत आहे. याचा फायदा म्हणजे, असंतोषामुळे भाजपमधून बाहेर जाण्याचा विचार करणारे अनेक लोक पुन्हा भाजपसोबत जेडले गेले आहेत. अशाप्रकारे बजरंगबलींनी भाजपला जणू संजीवनी बुटीच दिली आहे.
बजरंगबली म्हणजेच हनुमानजींचा जन्म कर्नाटकातील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे म्हटले जाते. पण, यासंदर्भात काही राज्यांमध्ये वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या सभांमध्ये 'बजरंगबली की जय' म्हटल्याशिवाय राहत नाहीत. एढेच नाही, तर हनुमानजींचा जन्म कर्नाटकातील किष्किंधा येथे झाला, याचा उल्लेख रामायणात आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
काँग्रेस जाळ्यात अडकली -बजरंगबलींचे नाव आल्यापासून काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली आहे. महत्वाचे म्हणजे, आता काँग्रेसचे सरकार आले तरी बजरंगदलावर बंदी घातली जाऊ शकत नाही, असे खुद्द कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली यांनी म्हटले आहे. तसेच, असा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसने पास केलेला नाही, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर जर काँग्रेस सत्तेत आली तर राज्य भरात हनुमानजींची मंदिरे बांधली जातील, असे काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.