नवी दिल्ली - आज देशभरात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण साजरा होत आहे. मात्र, यातच बंगालमध्ये एक मुस्लीम युवक असाही आहे, जो ईदनिमित्त होणारी जानवरांची कुर्बानी बंद करण्यात यावी, अशी मागणी करत निदर्शन करत आहे. कोलकात्यातील 33 वर्षीय अल्ताब हुसैन यांनी ईदनिमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानी विरोधात मंगळवारच्या रात्रीपासून 72 तासांचा रोजा धरला आहे. सांगण्यात येते, की अल्ताब यांच्या भावाने बकरी ईदनिमित्त एक बकरा कुर्बानीसाठी घरी आणल्याने ते नाराज झाले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कुर्बानीला विरोध करणारे अल्ताब हुसैन यांचे म्हणणे आहे, की हे प्राण्यांसोबत क्रूरपणे वागणे आहे आणि कुणीही याला विरोध करत नाहीत. प्राण्यांचा बळी आवश्यक नाही, याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी मी 72 तासांचा उपवास म्हणजेच रोजा धरण्याचा निर्णय घेतला आहे. हुसैन यांनी 2014 मध्येच प्राण्यांच्या अधिकारासाठी प्रचार करायला सुरुवात केली. डेअरी उद्योगात त्यांनी प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रुरतेवरील व्हिडिओ पाहिला. यानंतर त्यांनी मांसाहार करणे सोडले आणि शाकाहारी बनले. एवढेच नाही, तर त्यांनी चामड्याच्या वस्तूंचा वापर करणेही बंद केले आहे.
ते म्हणाले, मीही प्राण्यांच्या कुर्बानीत भाग घेत होतो. मात्र, एका व्हिडिओत मी पाहिले, की गाईंना कशा प्रकारे पाठीवर काठ्यांनी मारले जाते, त्यांना कशा प्रकारे दूध देण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर केला जातो, गाईच्या वासरांना वेगळे करून कशाप्रकारे कत्तलखान्यात पाठविले जाते, यानंतर मला वाटले, की मी असे करणे योग्य नाही. मी मांस, मासे, मध अथवा चांबड्याची उत्पादने वापरत नाही.
सोशल मिडियावर येतायत धमक्या -तीन वर्षांपूर्वीही, हुसैन यांच्या भावाने ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी घरी जनावर आणले होते. तेव्हाही हुसैन यांनी विरोध केला होता आणि त्यावर्षी त्यांना जनावर वाचविण्यात यश आले होते. मात्र, हुसैन यांचे कुटुंब त्यांना सपोर्ट करत नाही. हुसैन यांचे म्हणणे आहे, की त्यांनी जेव्हापासून प्राण्यांसोबत होणाऱ्या क्रोर्यावर बोलायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांना सोशल मिडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्यांना समर्थनही दर्शवले आहे.