नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्रानं सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय वायू दलातील वरिष्ठ अधिकारी (स्वाडूट लिडर) मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मिराज फाइटर 2000च्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा देखील गुरुवारी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय हवाई दलाकडून शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यामध्ये विंग कमांडर अमित रंजन, स्क्वॅार्डन लीडर राहुल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या शौर्य पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते.