नवी दिल्लीः पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात नवे खुलासे समोर आले आहेत. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा परदेशी पत्रकारानं दावा केला आहे. पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनोच्या रिपोर्टनुसार, आताही शिबिरांमध्ये जवळपास 45 जणांवर उपचार सुरू आहे. 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एअर स्ट्राइक करण्यात आलेला तो बालाकोटचा भाग अद्यापही सील करून ठेवण्यात आलेला आहे.जखमींवर योग्य उपचार होत नाहीत. बालाकोटमध्ये भारतानं एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानची सेना तिकडे पोहोचली आहे. जखमींना शिनकियारीमधील एका हरकत-उल-मुजाहिद्दीन शिबिरात नेण्यात आलं आणि पाकिस्तानी सेनेच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जे लोकांवर उपचार करण्यात आले आहेत, ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्यांमध्ये 11 दहशतवाद्यांचे प्रशिक्षक होते. ज्यात बॉम्ब बनवण्यापासून ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा समावेश आहे. यातील दोन ट्रेनर हे अफगाणिस्तानमधील होते.
भारतानं एअर स्ट्राइकमध्ये बालाकोटमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. परंतु किती दहशतवादी मारले गेले यावरून काहीसा संभ्रम आहे. त्यातच आता 130 ते 170 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बालाकोटमधूनच पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना ट्रेनिंग मिळाल्याचंही उघड झालं होतं.