शाहजहांपूर-
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी एक अजब घटना घडली. बालामऊ पॅसेंजर रेल्वेच्या मोटरमननं झोप पूर्ण न झाल्यानं रेल्वे चालवण्यास नकार दिला. त्यामुळे रेल्वे जवळपास अडीच तास स्टेशनवरच खोळंबली होती आणि रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं.
बालामाऊ पॅसेंजर गुरुवारी साडेतीन तास उशीरानं रात्री जवळपास १ वाजता शाहजहांपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. बालामाऊहून जो रेल्वे मोटरमन रेल्वे घेऊन आला होता. सकाळी त्यालाच बालामाऊला पुन्हा रेल्वे घेऊन जायची होती. पण रात्री रेल्वे येण्यास उशीर झाल्यानं मोटरमनची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी त्यानं सकाळी ७ वाजता ट्रेन चालवण्यास नकार दिला. जेव्हा माझी झोप पूर्ण होईल त्यानंतरच रेल्वे बालामाऊला जाईल, असं मोटरमननं स्पष्ट केलं आणि पुढचे अडीच तास रेल्वे स्थानकावरच गाडी खोळंबली होती.
"रात्री आराम केल्यानंतर ड्रायव्हर दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे परत बालामाऊला घेऊन जातो. पण रात्री झोप पूर्ण न झाल्यानं ट्रेन ड्रायव्हरनं रेल्वे परत घेऊन जाण्यास नकार दिला. त्याची झोप पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा ड्युटीवर रुजू झाला व रेल्वे बालमाऊसाठी रवाना झाली होती", असं शाहजहांपूर रेल्वे अधिक्षक अमरेंद्र गौतम यांनी सांगितलं.