ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मुंबईत २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या मास्टरमाइंड हफीज सईद हा पाकिस्तानचा हिरो आहे, असे खळबळजनक विधान पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. भारत हाफीज सईदबद्दल बोलत असतो, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दहशतवादी नव्हते का? त्यांना अटक का केली नाही? असा सवाल करत मुशर्रफ यांनी सईदची तुलना आरएसएस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केली. ठाकरे त्यांचे (भारत) हिरो होते तर हाफीज सईद, ओसामा बिन लादेन आमचे हिरो असल्याचे मुशर्रफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. भारतविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादी तयार केल्याची कबूलीही त्यांनी दिली.
पाकिस्तानने धार्मिक दहशतवाद पोसला आणि त्याचा आम्हाला फायदा झाला, असे मुशर्रफ म्हणाले. काश्मीरसाठी जिहाद करणा-या सईदलाही आम्ही हिरो मानतो, पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही तयार केलेल दहशतवादी आता पाकिस्तानातच हल्ला करत असल्याने ते आमच्यासाठी व्हिलन ठरत असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. पाकिस्तानने अल-कायदासह अनेक दहशतवादी संघटनांना मदत केली. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी लष्कर-ए-तयब्बाच्या तरूणांना पाकिस्ताननेच प्रशिक्षण दिल्याचे मुशर्रफ यांनी कबूल केले.
पाकिस्तानात अतिरेक्यांना प्रशिक्षण मिळते या भारताच्या दाव्याला मुशर्रफ यांच्या कबुलीमुळे बळ मिळाले असून आपण नेहमीच दहशतवादाविरोधात लढा दिल्याचा पाकिस्तानाचा दावाही खोटा ठरला आहे.