नवाबगंज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात मोठा विरोध पाहायला मिळत आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. माफी मागा अन् अयोध्येत या असं त्यांनी म्हटलं आहे. ५ जूनला राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचसाठी आज साधू महंतांशी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असं सांगितले जात आहे.
बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर रॅली काढली आहे. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत. यावेळी बृजभूषण सिंह म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानतो. हा आमच्या अस्मितेशी लढा आहे. राज ठाकरेंनी माफी मागावी. जर आज माफी मागितली नाही बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आयुष्यात कधीही येता येणार नाही. माझा विरोध मराठी माणसांशी नाही. ज्या व्यक्तीने उत्तर प्रदेशातील लोकांना त्रास दिला त्याने माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ नये असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) हे खूप मोठे नेते होते. एकदा काहीतरी विधान केल्याने त्यांनीही उत्तर प्रदेशची माफी मागितली होती. माफी मागितल्याने कुणीही लहान होत नाही. राज ठाकरेंनी माफी मागावी. हीच ती वेळ आहे. यापुढे यूपीतील लोकांना त्रास देणार नाही असं सांगाव अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केल्यापासून मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. त्यानंतर येत्या ५ जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र उत्तर प्रदेशात राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध वाढला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे.
मागे हटणार नाही, आंदोलनावर ठाम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. "राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे.