हरीश गुप्ता।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोजकांनी दिलेले नाही. अर्थात अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आलेले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मात्र अपवाद करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार की नाही, हा प्रश्नच आता निकाली निघाला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांच्याशी ‘लोकमत’ने सोमवारी सकाळी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.आलोककुमार म्हणाले की, भूमिपूजन समारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने पार पाडावा, या ठाकरे यांच्या विधानामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दुखावले आहेत. मात्र त्यांना निमंत्रण न देण्याचा ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. निमंत्रण देताना काही मंडळींचा अपवाद करणार का, या प्रश्नावर आलोककुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भूमीपूजन समारंभाला उपस्थित असतील. आवश्यकता भासल्यास काही व्यक्तींचा अपवाद करून त्यांना निमंत्रण पाठविले जाईल.
कार्यक्रमासाठी राज्यपालांना निमंत्रण दिलेले नाही. देशात भाजपचे १२ मुख्यमंत्री असून, सहा राज्यांत भाजपने आघाडीचे सरकार आहे. पण यापैकी एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण दिलेले नाही. हा अत्यंत पवित्र असा विधी आहे. त्याद्वारे भूमातेला वंदन करण्यात येते. अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाºया राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ््याला २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असणार नाहीत, हे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले. असे असूनही कोरोना साथीचे कारण दाखवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्याविषयी व्यक्त केलेली चिंता खोटी आहे, अशीही घणाघाती टीका आलोककुमार यांनी केली....ती शिवसेना राहिली नाही!आलोककुमार म्हणाले की, राममंदिराचे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावे, या विधानातून या मुख्यमंत्री ठाकरे यांचा आंधळा विरोध दिसून येतो. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्ववादी संघटना होती. पण आता या संघटनेचे किती पतन झाले आहे, हे ठाकरे यांच्या उद्गारातून दिसून येते.
दूरदर्शनखेरीज अन्य माध्यमेही नाहीतया कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अन्य वृत्तवाहिन्यांवरही तो पाहायला मिळेल. मात्र केवळ दूरदर्शनचे कॅमेरामन व पत्रकार यांनाच तिथे हजर राहण्याची अनुमती आहे. अन्य पत्रकार व प्रसार माध्यमांना हजर राहता येणार नाही.