नवी दिल्ली: उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांच्यानंतर डीएमकेचे नेते ए राजा, मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपूत्र प्रियांक खर्गे यांनीही सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. या मुद्द्यावरुन भाजप काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीवर निशाणा साधत आहे.
सनातनचा अपमान इंडियाचा अजेंडारविशंकर प्रसाद म्हणाले, अहंकारी आघाडीचे लोक सनातन धर्मावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या मुद्द्यावर आम्ही सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना प्रश्न विचारला. पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. सनातनचा विरोध करणे, हा इंडिया आघाडीचा अजेंडा आहे. इतर कोणत्याही धर्मावर बोलण्याची हिंमत काँग्रेसमध्ये आहे का? हे लोक फक्त व्होट बँकेसाठी सनातन धर्माचा अपमान करत आहेत. काँग्रेसचा एकही मोठा नेता रामजन्मभूमीला भेट देण्यासाठी गेला नाही. आम्ही सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही. हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.
उद्धव ठाकरेंवर बोचरी टीकायावेळी रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार प्रहार केला. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी गोध्रासारखी घटना घडेल, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कमाल वाटते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी राम मंदिराच्या आंदोलनाला नव्या उंचीवर नेले, त्यांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही खूप शरमेची बाब आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
संबंधित बातमी- 'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लालू यादव-अखिलेश गप्प का?लालू प्रसाद यादव मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी वैद्यनाथ धामचेही दर्शन घेतले. पण, सनातनच्या अपमानावर एक चकारही काढला नाही. अखिलेश यादवही गप्प आहेत. मी पुन्हा विचारेन, सोनिया गांधी, तुम्ही गप्प का आहात? तुमचा सनातनच्या विरोधाला पाठिंबा आहे का? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आपल्या मुलाच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत.
असा सुरू झाला वाद...उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याने या वादाची सुरुवात झाली. उदयनिधींनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली आणि सनातनला नष्ट करावे लागेल, असे म्हटले. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगशी केली. तसेच, तामिळनाडू सरकारमधील मंत्री पोनमुडी यांनीही या वादाला वाढवण्याचे काम केले. त्यांनी 'इंडिया' आघाडी सनातनाला विरोध करण्यासाठीच स्थापन केल्याचे म्हटले. या सर्व विधानांमुळे हा वाद वाढला आहे.