एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर राजकारण सुरू झाले आहे. यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका केली. या अपघाताची उच्चस्तरीय चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘राजद’नेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘कवच’मध्येही काही झाले का? असा सवाल करून सरकारसाठी केवळ ‘वंदे भारत’मध्ये प्रवास करणारीच माणसे आहेत, अशी टीका केली.
सुरक्षेकडे दुर्लक्ष : तृणमूलचा आराेप
तृणमूल काॅंंग्रेसने रेल्वे अपघातावरून केंद्र सरकारवर टीका करतानाच प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात रेल्वेगाड्यांमध्ये टक्करविराेधी उपकरण लावण्याचा निर्णय घेतला हाेता. ती आतापर्यंत लागलेले नाहीत.
तिकिटांचे दर वाढवाल तर खबरदार!
रेल्वे अपघातानंतर भुवनेश्वरवरून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांची अवास्तव भाडेवाढीवर लक्ष ठेवून असे प्रकार राेखण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. अपघातामुळे तिकीट रद्द करणे किंवा प्रवासाच्या पुनर्नियाेजनासाठी काेणतेही अतिरिक्त शुल्क घ्यायला नकाे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट
एकीकडे स्थानिक लोकांनी-तरुणांनी रक्तदानासाठी रात्रीच रुग्णालयांमध्ये धाव घेतली, तर दुसरीकडे खासगी बसमालकांकडून मात्र टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. अनेक ट्रेन रद्द झाल्यामुळे पश्चिम बंगालमधून 'जगन्नाथ स्नान यात्रा'साठी पुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बसचालकांनी भाडे अचानक दुप्पट किंवा तिप्पट केले. भद्रक, कटक आणि पुरीला नॉन-एसी बसमधून प्रवासासाठी साधारणतः अनुक्रमे ४००, ६०० आणि ८०० रुपये लागतात. त्याच प्रवासासाठी सुमारे १२०० ते १५०० रुपये, तर काही एजंटांनी २,००० ते २,५०० रुपयेही मागितल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.