भुवनेश्वर/बालासोर : कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट आणि त्याचा सहायक हे गंभीर जखमी आहेत. रेल्वे अपघातासाठी लोको पायलट आणि त्याच्या सहायकाला जबाबदार धरत अनेक अफवा पसरत असल्याने या दोघांचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात जगत आहेत.
रिपोर्टसनुसार, माध्यमांनी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस चालविणारे ३६ वर्षीय सहायक लोको पायलट हजारी बेहेरा यांच्यावर भुवनेश्वरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक मीडिया त्यांच्या कथित मृत्यूबद्दल खोट्या बातम्या देत असल्याने त्यांचे कुटुंब दु:खी आहे.
“माझा नवरा अजूनही रुग्णालयात उपचार घेत असताना अशा खोट्या बातम्यांमुळे जखमींच्या कुटुंबावर किती परिणाम होऊ शकतो हे मीडियाला कळत नाही”, असे बेहरा यांच्या पत्नीने म्हटले.
बेहरांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर आणि अनेक जखमा आहेत. त्यांचे सहकारी, लोको पायलट जी. एन. मोहंती यांचीही प्रकृती गंभीर असून ते त्याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आहेत. तथापि, अशा स्थितीत लोको पायलट काहीही करू शकत नाहीत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इंटरलॉकिंगमधील त्रुटी फेब्रुवारीतच निदर्शनास आणल्या होत्या
- रेल्वेच्या इंटरलॉकिंग यंत्रणेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे एका अधिकाऱ्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासंदर्भात त्याने एक पत्र लिहिले होते. इंटरलॉकिंग यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटींमुळेच ओडिशामधील भीषण रेल्वे अपघात घडला असावा, अशी शक्यता प्राथमिक तपास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
- या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. इंटरलॉकिंग यंत्रणेतील त्रुटींबाबत फेब्रुवारी महिन्यात रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली होती.
- फेब्रुवारीमध्ये म्हैसूर विभागातील होसदुर्गा स्टेशननजीक एका एक्स्प्रेसचा सिग्नल फेल होण्याचा मुद्दा रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजरने आपल्या पत्रात उपस्थित केला होता. या घटनेला इंटरलॉकिंग यंत्रणेतील त्रुटी कारणीभूत असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले होते.