देशात दरवर्षी 23 डिसेंबर या दिवशी 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा करण्यात येतो. भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होतो. देशभरात आज शेतकऱ्यांच्या कष्टाची, कामाची आठवण ठेवण्याचा आजचा दिवस. शेतात राबराब राबून जगासाठी अन्न पिकवणाऱ्या जगाच्या पोशिंद्याचे स्मरण करुन नमन करण्याचा आजचा दिवस आहे. सोशल मीडियातून सकाळपासूनच बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी शेतकऱ्यांप्रती चार ओळी लिहून तर काहींनी कलाकृती सादर करत बळीराजाचा आदर केला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत बळीराजाचं चित्र साकारलं आहे.
देशाचे दिवंगत पतंप्रधान चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर या त्यांच्या जन्मदिनी हा दिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांत शेतकऱ्यांप्रती आदरभाव सादर करणारे उप्रकम राबविण्यात येतात.
शेतकरी आणि ट्रॅक्टरचा नातं हे आता बैलं आणि बळीराजाचं नातं असाव तसंच बनलं आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांप्रती ट्रॅक्टरच्या माध्यमातून आदरभाव व्यक्त करण्यात आला आहे. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून भल्यामोठ्या जागेत शेतकऱ्याची प्रतिमा सकारली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरचे दिवे लावून हा प्रतिमा उजळल्याचंही पाहायला मिळतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत, देश की तस्वीर है किसान... असं कॅप्शन त्यांनी दिलंय. त्यांचा हा व्हिडिओ नेटीझन्सला चांगलाच आवडल्याचं दिसून येत आहे.