ज्या वयात हातात वह्या, पुस्तकं असायला हवी होती, आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. दोन मुलींनी लहान वयातच आई-वडील गमावले. पण तरीही या दोन मुलींनी हार मानली नाही आणि आपली जिद्द कायम ठेवली.
स्वीटी सिंह आणि पूजा सिंह सांगतात की, आम्ही जिल्ह्यातील बांसडीह रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मनियारी जसाव येथील रहिवासी आहोत. पूजा सिंह ही स्वीटी सिंहची आत्या आहे. जिने स्वीटी सिंहला मोठं केलं. कारण स्वीटीच्या आई-वडिलांचं खूप कमी वयात निधन झालं. घरात कोणीच नसल्याने आत्याने मुलींना सांभाळलं. या दोघींनी जिल्ह्यातील कुंवर सिंह कॉलेजमधून बीए पूर्ण केलं आहे. त्याच दरम्यान गुळाच्या चहाचं दुकान सुरू झालं. जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील.
पूजा सिंहने सांगितलं की, आम्ही आमच्या गावातून दूध आणतो आणि चहा बनवतो. जे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात ते चहामध्ये टाकले जात नाहीत. हा गुळाचा चहा लवंग, वेलची, आलं आणि तुळस इत्यादी घटक वापरून तयार केला जातो. जे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ग्राहकांना लहान कप 10 रुपये आणि मोठा कप 20 रुपये या किमतीने दिला जातो. हे दुकान पहाटे 5:30 ते 11:00 पर्यंत सुरू असतं. त्यानंतर दोन्ही मुली शिक्षणासाठी वेळ देतात.
हे दुकान जगदीशपूर चौकात, बलिया रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. चहा पिण्यासाठी दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांनी चहाची चव अप्रतिम असल्याचे सांगितले. हा गुळाचा चहा आहे जो आरोग्यासाठीही हानिकारक नाही. सध्या या मुलींची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.