झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून 300 कोटींहून अधिक रोख आणि मौल्यवान दागिने सापडल्यानंतर राजकारण तापलं आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे.
काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करताना भाजपा आमदार बालमुकुंद आचार्य म्हणाले की, "कपाटांमध्ये 310 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे, जनतेला त्यांचे खोटे आरोप माहीत आहेत, सर्व एजन्सी त्यांच्याकडे जमा केलेले पैसे काढून घेतील, दोषींना शिक्षा होईल. संपूर्ण देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे त्यांनी लुटमार केली आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ."
आयकर विभागाच्या टीमने धीरज साहू य़ांच्या घरावर छापे टाकून आतापर्यंत 225 कोटींहून अधिक रोख जप्त केले आहेत. आयकर विभागाच्या टीमने रांचीच्या रेडियम रोडवरील धीरज साहू यांच्या सुशीला निकेतन या घरातून तीन सुटकेस ताब्यात घेतल्या आहेत. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॅगेत राहत्या घरातून जप्त केलेले दागिने आहेत.
बालमुकुंद आचार्य हेही अलीकडच्या वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळे चर्चेत आले आहेत. जयपूरच्या हवामहल परिसरात उघड्यावर नॉनव्हेज फूड स्टॉल लावणाऱ्यांना त्यांनी अल्टिमेटम दिला होता. बालमुकुंद आचार्य यांनी अधिकाऱ्यांना बोलावून सायंकाळपर्यंत शहर स्वच्छ करावं, असं सांगितले होतं. नॉनव्हेज विकणाऱ्यांविरोधात ते आक्रमक झाले आहेत.